- “ड्राय डे’चा गैरफायदा ः पोलिसांना धक्काबुक्की, “ऍट्रोसिटी’ची धमकी
पिंपरी – इनोव्हा मोटारीतून दारू विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी त्याच्या वडिलांनी पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की केली. तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री सव्वा आठच्या सुमारास गणेशनगर बोपखेल येथे घडली. रविवारी प्रजासत्ताक दिन असल्याने “ड्राय डे’ होता. या दिवशी सर्व दारुची दुकाने आणि बार बंद असतात. याचाच गैरफायदा घेत आरोपी इनोव्हामधून तळीरामांना दारु विकत होते.
पोलीस उपनिरीक्षक कुणाल बालाप्रसाद कुरेवाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र रवींद्र वाघमारे (वय 45, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कुरेवाड यांनी आरोपी महेंद्र याचा मुलगा स्वप्निल वाघमारे (वय 21) हा इनोव्हा कारमधून दारू विक्री करत असताना आढळला. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारणावरून आरोपी महेंद्र वाघमारे याने मोठ्याने आरडा-ओरडा केला.
तसेच माझी गाडी व मुलाला का ताब्यात घेतले, असे म्हणत पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड यांना धक्काबुक्की केली. “मी दलित पॅंथर आणि माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. तुमची नोकरी घालवू शकतो. तुमच्यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करतो.’ अशी धमक्री दिली. आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.