वालचंदनगर-बिरंगुडी, कळस (ता. इंदापूर) येथील बाळूमामा आध्यत्मिक तळावरील पालखी सोहळा व बाळूमामा उत्सव करोना रोगाच्या दक्षता प्रतिबंधात्मक उपाययोजना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असून भाविकांनी या आध्यत्मिक तळावर उपस्थित राहू नये व गर्दी करू नये असे आवाहन अध्यक्ष दिलीप वाघमारे यांनी दिली आहे.
सद्गुरू बाळूमामा उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 19) सकाळी 7 वाजता स्वामी समर्थ मंदिर साईनगर जंक्शन ते ओगलेवस्ती कळस येथील सदगुरू बाळूमामा अध्यात्मिक तळापर्यंत बाळूमामाच्या पालखीचे प्रस्थान, भजन, महाप्रसाद व सुप्रसिद्ध गायक विजय सारतापे यांचा गाण्याचा कार्यक्रम व शुक्रवारी (दि. 20) सद्गुरू बाळूमामा उत्सवानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन व आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सद्गुरु संत श्री बाळूमामा उत्सव रद्द करण्यात आल्याची नोंद समस्त भाविकांनी घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्यावतीने करण्यात आले आहे.