पिंपरी – पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. 16) आळंदी येथे ही कारवाई केली.
अविनाश बाळू धनवे (वय 28, रा. चऱ्होली, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे कमर्चारी हद्दीतील गुन्हेगार तपासत असताना पोलीस कर्मचारी आशिष बनकर, गणेश कोकणे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली की, तडीपार गुंड धनवे हा आळंदी येथील अगस्ती मंगल कार्यालयात लग्नाला आला आहे.
त्यानुसार त्यांनी कार्यालय परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अंगझडती घेतली असता धनवेच्या कंबरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे मिळून आली आहेत. धनवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्यात एकूण चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.