सातारा, दि. 4(प्रतिनिधी)
खटाव तालुक्यातील निमसोड येथील एका दारू अड्ड्यावर मायणी पोलिसांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास छापा टाकला. यावेळी देशी- विदेशी दारूच्या पाच हजार रुपये किंमतीच्या 96 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
याप्रकरणी सुनिल बाबुराव संकपाळ (रा.लोहार आळी, निमसोड) याच्याविरोधात दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी हवालदार शिवाजी कोळी यांच्या तक्रारीवरून वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संकपाळ हा अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी की, निमसोड (ता. खटाव) येथे लोहार आळी याठिकाणी संकपाळ हा दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना मिळाली होती.
त्यानंतर गोसावी यांनी कर्मचाऱ्यांसमवेत संकपाळ दारू विक्री करत असलेल्या ठिकाणी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पाच हजार रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या 96 बाटल्या जप्त केल्या.
मात्र, अंधाराचा व सतत सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत संकपाळ पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही करावाई पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, हवालदार नवनाथ शिरकुळे, बापूराव खांडेकर, चालक पवार यांनी केली.