पुणे,दि.22- भारतातील नामांकित कंपन्यांचे घरगुती वापराच्या ब्रॅंडसची बनावट उत्पादने गुन्हेशाखा युनिट तीनच्या पथकाने जप्त के ली आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका गोडाऊनवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. येथून एकून 16 लाख 400 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. संशयीत व्यापारी हे मुळचे गुजरात राज्यातील कच्छचे असून ते दोन वर्षापासून गोडाऊन घेऊन हा व्यवसाय करत होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना कात्रज-कोंढवा येथील गोकुळनगर येथे एका पत्र्याच्या गोडाऊनमधून लायझॉन, विम, व्हिल डिटर्जन पावडर, फेअर ऍन्ड लव्हली, विको टर्मरीक , हार्पिक, कोलीन या नामांकित कंपनीची बनावट उत्पादने शहर व इतर ठिकाणी पुरवठा करण्यात येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार शुक्रवारी छापा टाकून बनावट माल जप्त करण्यात आला. येथे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टिकर आणी कच्चा मालही आढळून आला. याप्रकरणी हितेश राघवजी सावरिया(30) यास अटक करण्यात आले. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी कारवाई केल्यावर संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मालाची पहाणी केली. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीची डिजर्टन पावडर, फेअर क्रीम, लिक्वीड सोप बनावट आढळले. भारतातील नामांकित कंपन्यांचा बनावट माल विक्री करुन कंपनी तसेच शासनाची फसवणूक तसेच स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, अतुल साठे, दत्तात्रय गरुड, प्रविण तापकिर, संदिप तळेकर, शकील शेख, मच्छिंदअ वाळके, गजानन गनबोटे, दत्तात्रय गरुड, सुजित पवार यांच्या पथकाने केली.