वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश मोरे यांचा गौरव
रेडा- इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमने कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी राबवला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांना प्रमाणपत्र देऊन आमदार लक्ष्मण जगताप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. बी. नांदापूरकर यांच्या उपस्थितीत नुकतेच गौरवण्यात आले. लक्ष्य प्रसुती सेवा 2018- 19 या कार्यक्रमांमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला. पुणे परिमंडळाचे उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन बलोलीकर यांनी डॉ. राजेश मोरे यांचे अभिनंदन केले आहे.
आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी डॉ. मोरे यांचा विशेष सन्मान केला आहे. डॉ. मोरे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना सुविधा आरोग्यसेवा योग्यरितीने देण्यासाठी जिल्हा आरोग्य केंद्राची टीम परिश्रम घेत असते. अनेक लहान मोठ्या आजारावर उपचार, शस्त्रक्रिया रुग्णालयात यशस्वी पार पाडल्या जातात. भविष्यात उपजिल्हा रुग्णालयात वेगवेगळे उपक्रम राबवून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.