सहावी ते दहावी विज्ञान शिक्षकांसाठी ऑनलाईन पदविका अभ्यासक्रम

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी) इयत्ता सहावी ते दहावी वर्गांना विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक शिक्षकांना दि. 30 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन “विद्या प्राधिकरण’द्वारे करण्यात आले आहे.

नवी दिल्लीच्या “एनसीईआरटी’मार्फत हा पदविका अभ्यासक्रम 1 मे 2019 पासून सुरू करण्यात आला असून, महाराष्ट्रात 31 शिक्षकांनी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. परंतु महाराष्ट्रातून अधिक शिक्षक इच्छुक असल्यास, त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी अर्ज करावयाचे आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) संचालक डॉ. सुनील मगर यांनी पत्रकाद्वारे दिली.

या अभ्यासक्रमांमध्ये विज्ञान विषय शिकविण्यासाठीचे 40 मोड्युल साध्या, सोप्या इंग्रजी भाषेमध्ये दिलेले आहेत. एक मोड्युल एका आठवड्यात याप्रमाणे 40 मोड्युल 40 आठवड्यात शिक्षकाने ऑनलाईन पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षकाला प्रत्येक आठवड्याला 8 ते 10 तासांचा कालावधी द्यावे लागणार आहे. या पदविका अभ्यासक्रमासाठी शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी 1 हजार रुपये, तर खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांमधील शिक्षकांसाठी 3 हजार रुपये इतके नोंदणी शुल्क राहील. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना “एनसीईआरटी’मार्फत “डिप्लोमा इन टीचिंग ऑफ सायन्स’ ही पदविका देण्यात येणार आहे.

पदविका अभ्यासक्रमांसाठी इच्छुक शिक्षकांनी https://www.research.net/r/scionlcourse या लिंकवर आपली माहिती 30 मे 2019 पर्यंत भरावी. या लिंकद्वारे प्राप्त झालेल्या इच्छुक शिक्षकांची नावे “एनसीईआरटी’ना कळविले जाईल. त्यांच्या मान्यतेनंरच इच्दुक शिक्षकांना या अभ्यासक्रमासाठीचे नोंदणी शुल्क भरण्याबाबत कळविले जाईल. नोंदणीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर या अभ्यासक्रमासाठीचा लॉगीन आयडी व पासवर्ड संबंधित शिक्षकाला मेलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सुनील मगर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.