लाहोर : पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता गोठवण्याचे आदेश पाकिस्तानातील उत्तरदायित्व न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्था अर्थात “नॅशनल अकौंटेबिलीटी ब्युरो’ने दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील मनी लॉन्डरिंगच्या तपासाशी संबंध असलेल्या शाहबाझ शरीफ, त्यांचे चिरंजीव हमझा शहबाझ आणि सुलेमान शहबाझ यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांची स्थावर मालमत्ता गोठवण्यात यावी, अशी मागणी या अर्जामध्ये करण्यात आली होती.
तत्पूर्वी “नॅशनल अकौंटेबिलीटी ब्युरो’चे सरकारी वकील हाफिज असद अवान यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यावर अकौंटेबिलीटी कोर्टाचे न्यायाधीश आमिर मोहंम्मद खान यांनी या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता.
शाहबाझ त्यांच्या बायका आणि मुलांशी संबंधित असलेल्या आणि पाकिस्तानात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 23 मालमत्ता गोठवण्यात येणार आहेत.