व्हॉटसअपवर मेसेज ; सांगलीकरांची पुणेकराला मारहाण  

 

सांगलीतील तरुणांचा पुण्यात येऊन राडा
एकाला बेदम मारहाण : व्हॉट्‌स ऍपवर मेसेजचे कारण

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.21- कुंडल जि. सांगली येथील नागरिकांच्या व्हॉट्‌स ऍप ग्रूपवर संदेश पाठविल्याने चिडलेल्या पाच जणांनी पुण्यात येऊन एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना पौड रस्ता परिसरात घडली.
या प्रकरणी गुरूप्रसाद लाड, जगदीश लाड, सूरज लाड, संदीप लाड, आशुतोष लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित लाड (22, रा. मोरे श्रमिक वसाहत, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित लाड मूळचा कुंडलचा आहे. तो पौड रस्ता भागातील मोरे श्रमिक वसाहतीत राहायला आहे. या गावातील रहिवासी तरुणांचे “लाड सरकार’ आणि “एल ग्रुप’ हे व्हॉट्‌स ऍप समूह आहेत. कुंडल गावातील पुरानंतर अजित लाडने गावातील व्हॉट्‌सऍप समुहावर “आमदार साहेब मदत करतात, बाकीचे लाडोबा कुठे गेले’ असा संदेश पाठविला होता.
त्यानंतर उपरोक्‍त पाच जण मोटारीतून पहाटे पुण्यात आले. त्यांनी अजितच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. “तू बदनामी करणारा संदेश का पाठविला?’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर अजितला त्यांनी घरातून बोलावून घेतले. पहाटे साडेचारच्या सुमारास अजितला पौड रस्त्यावर नेले. तेथे त्याला रबरी ट्यूबने बेदम मारहाण केली. यात अजितचे कपडे फाटले. त्यानंतर “गावात येऊन आमची माफी मागयाची नाही, तर तुला मारून टाकू,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. अजितने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर खटके तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.