मनोबलात होतेय वाढ; जिल्ह्यातील 18 गर्भवती महिलांनीही केली करोनावर मात
संतोष पवार
सातारा – करोनाला हरवायचे ध्येय घेऊन रणांगणात उतरलेल्या जिल्ह्यातील 21 करोना योद्ध्यांना करोनाची बाधा झाली. मात्र, या योद्ध्यांनी करोनाबरोबरची लढाई जिंकली. त्याचबरोबर जिल्ह्यात 18 गर्भवती महिलांनाही करोनाची बाधा झाली. या महिला आणि त्यांची नवजात बालके यांनीही करोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मनोबलात निश्चितच वाढ झाली आहे.
करोनाचा फैलाव रोखणे, गावोगावी, घरोघरी जावून सर्व्हे करणे, करोना संशयितांवर उपचार करणे आदी महत्वपूर्ण कामाची जबाबदारी जिल्हा प्रशासनातील विविध घटकांवर होती. आतापर्यंतची संकटे आणि करोनाचे संकट यामध्ये खूप वेगळेपण होते. करोनाचा प्रसार हा संसर्गाने होत असल्याने याचा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका होता. त्या तुलनेत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे असणारी यंत्रणा तोकडी होती. शहरी व ग्रामीण भागात करोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. प्रशासनातील विविध घटकांनी न डगमगता करोनाच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावून सर्वांचेच मनोबल वाढेल, असे काम करुन दाखवले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखताना जिल्ह्यातील विविध विभागांतील 21 करोना योद्धे करोनाबाधित झाले होते. मात्र, त्यांनी या संकटाचा सामना मोठ्या धीराने केला. कराड तालुक्यात सर्वाधित 12 करोना योद्धे बाधित झाले. यामध्ये सहा परिचारिका,
खासगी रुग्णालयातील एक मदतनीस, आशा स्वयंसेविका 1, फार्मासिस्ट 1, चालक 2, खासगी डॉक्टर 1 यांचा समावेश होता. कोरेगाव तालुक्यातील एक महिला सफाई कामगार, एक परिचारिका, माण तालुक्यातील एक खासगी वैद्यकीय व्यवसायिक, फलटण येथील एक परिचारिका, वाई ग्रामीण रुग्णालयातील एक सफाई कामगार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील चालक, जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक एक्सरे टेक्निशियन, एक परिचारिका, शिरवळ चेकपोस्टवरील एक पोलिस उपनिरीक्षक असे 21 करोना योद्धे बाधित आढळले. त्यांनी करोनाला हरवले.
पुन्हा एकदा नव्या उमेदीने हे योध्दे नागरिकांच्या सेवेसाठी रणांगणात उतरणार आहेत. करोना योद्ध्यांप्रमाणेच जिल्ह्यात 18 गर्भवती महिला करोनाबाधित आढळल्या. प्रशासनापुढे मोठे आव्हान होते. या संकटावरही आरोग्य यंत्रणेने मात केली. सर्व गर्भवती महिला व त्यांची नवजात बालके सुरक्षित असून त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या टीमवर्कमुळे जिल्ह्यातील करोना परिस्थिती हाताळण्यात यश येत आहे.
———————