प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत दूरशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाइन लिंक आजपासून खुली करण्यात आली आहे. या लिंकवरून विद्यार्थ्यांना बी.ए.,एम.ए. आणि बी.कॉम.,एम.कॉम. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.
विद्यापीठाने यंदाच्या वर्षापासून बहि:स्थ अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद केले आहे. त्यानंतर गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दूरशिक्षण अभ्यासक्रमाचा प्रवेशाला अखेर सुरूवात झाली आहे. http://www.unipune.ac.in/sol या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार आहे. “स्कूल ऑफ ओपन लर्निंग’ असे पोर्टल विद्यापीठाच्या होम पेजवर उपलब्ध आहे. त्यावर प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच, अभ्यासक्रमनिहाय प्रवेशाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दूरशिक्षणासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुक्त अध्ययन प्रशालेचे अतिरिक्त संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी केले आहे. ऑनलाइन शुल्क दि. 29 ऑगस्टपासून भरता येणार आहे.
दरम्यान, या शिक्षणाचा फायदा हा नोकरी मिळविण्यासाठी, नोकरीत बढतीसाठी, विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी, घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या गृहिणी व अनेक कारणांमुळे पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शिक्षणापासून वंचित राहिलेले नागरिक, इत्यादींना काम करता करता शिक्षण घेणे अगदी सहज सोपे होणार आहे.