मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरणास निधी मंजूर
शिंदे वासुली- चाकण – वांद्रे या प्रमुख जिल्हा मार्गावरील करंजविहीरे येथील थोपटवाडी व कोळीये येथील भालसिंगवाडी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी खेड तालुका भाजप अध्यक्ष अतुल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या मागणीवरून तत्कालीन पालकमंत्री व पुणे शहराचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मंजूर केला आहे.
शरद बुट्टे पाटील आणि अतुल देशमुख जिल्हा परिषद सदस्य असून बापट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करत असताना खेड तालुक्यातील मागासलेल्या ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या व अडचणीच्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. यातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही रस्ते प्रगतीपथावर आहेत.
भामखोऱ्यातील वांद्रे रस्त्यालगत असलेल्या करंजविहीरे गावातील थोपटवाडी व कोळीये येथील भालसिंगवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामास निधी देण्याची मागणी अतुल देशमुख व शरद बुट्टे पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार नुकतेच मुख्यमंत्री सडक योजनेतून 1.750 किमी अंतराच्या थोपटवाडी रस्ता डांबरीकरणासाठी 1 कोटी 6 लाख रुपये व भालसिंगवाडी येथील 1.750 किमी रस्ता डांबरीकरणासाठी 1 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ग्रामविकास विभागाने शुक्रवारी (दि. 7) शासन निर्णयात जाहीर केले असल्याचे व लवकरच या कामांच्या ई निविदा होवून पावसाळा संपताच ही कामे सुरू होणार असल्याची माहिती शरद बुट्टे पाटील यांनी दिली.