सुनील राऊत
पुणे : “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले पोलीस अनेकदा निष्ठुर असल्याची टीका केली जाते. मात्र, या खाकी वर्दीतही आत मध्ये माणूसच असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बीट मार्शल म्हणून नेमून दिलेल्या भागात गस्त घालताना रस्ता शोधण्यासाठी चाचपडत असलेल्या एका अंध व्यक्तीला आपल्या गस्तीच्या गाडीवरून त्याच्या इच्छित स्थळी सोडत खाकी वर्दीतही ” डोळस” माणुसकी असल्याचा प्रत्यय या बीट मार्शलने दिला आहे. सागर कुंभार आणि वसीम राजपूत असे या बीट मार्शलचे नाव असून ते विश्रामबागवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
कुंभार आणि राजपूत हे सायंकाळी पाचच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी जवळून गस्तीसाठी जात होते. त्यावेळी त्या ठिकाणी गणेश मंदिरा जवळ रामचंद्र कबुले हे दिव्यांग थांबले होते. दोन्ही डोळ्यांना दिसत नसल्याने ते आपली काठी घेऊन डेक्कनकडे जाण्यासाठी रस्ता शोधत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर सागर आणि वसीम यांनी काबुले यांना कुठे जायच आहे अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी डेक्कनला जायचे असून मला शास्त्रीरस्त्याकडे कसे जायचे हे सांगण्याची विनंती केली. मात्र, रस्ता लहान, वर्दळ जास्त आणि वळणा वळणाचा असल्याने काबुले यांना शास्त्री रस्त्याला जाणे अवघड असल्याचे लक्षात येताच. वसीम हे गाडी वरून खाली उतरले आणि नंतर सागर यांनी काबुले यांना दुचाकीवर बसवून शास्त्री रस्त्याकडे घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा परत येत सागर आणि वसीम आपल्या गस्तीच्या जबाबदारीवर निघून गेले. मात्र, या दोन्ही पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीने आसपासचे लोकही भारावून गेले.