नवी दिल्ली: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उद्यापासून चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांबरोबरचे भारताची सर्वंकष धोरणात्मक भागीदारी उपराष्ट्रपतींच्या भेटीमुळे अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे.
व्हिएतनाममधल्या नेत्यांबरोबर उपराष्ट्रपतींची चर्चा होणार असून संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात उपराष्ट्रपती बीज भाषण देणार आहेत. व्हिएतनामची राजधानी हनोई येथे ते भारतीय समुदायाला संबोधित करतील.
व्हिएतनामच्या उपराष्ट्रपतींची नायडू भेट घेणार असून त्यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. व्हिएतनामच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांचीही नायडू भेट घेतील. व्यापार आणि गुंतणूक संबंधांसह इतर विषयांवरही उच्चस्तरीय चर्चेमध्ये विस्तृत चर्चा अपेक्षित आहे. तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्रात संधींचा शोध, भारतीय औषध निर्माण कंपन्यांना व्हिएतनाममध्ये सुविधा, संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानात सहकार्य, व्हिएतनामच्या संरक्षण दलासाठी प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी, दोन्ही देशांतले सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे या मुद्यांवरही चर्चा होईल.