मायक्रो स्क्रीन्स्‌: स्पर्श…

प्राजक्‍ता कुंभार

माणूसकी, बघायला गेलं तर आपलं माणूस असणं उलगडवून दाखवणारा, इतर जीवांच्या तुलनेत आपलं वेगळेपण अधोरेखित करणारा शब्द आहे हा. पण जमेल त्या प्रसंगात आणि वाट्टेल त्या संदर्भात या ‘माणूसकी’ शब्दाचा वापर करून त्याची अवस्था ‘अतिपरिचयादवज्ञा’ झालीये असं वाटतं राहत मला. माणुसकीने वागायचं म्हणजे नेमकं वागायचं कसं? ही भावना म्हणजे काही भव्यदीव्य गोष्ट आहे की काहीतरी अगदी साधंसोप्पं, हे सांगणार कोण? खरंतर इतरांशी, झालंच तर काही काळासाठी आयुष्यात येणाऱ्या अनोळखी लोकांशी किमान बरं वागूया हे एवढं जरी डोक्‍यात आलं, तरी बऱ्यापैकी ‘माणुसकी’ अचिव्ह झाली असं समजायला हरकत नाही. आणि तरीही ‘ माणूसकी म्हणजे काय रे भाऊ …?’ या प्रश्नाने डोक्‍यात मुंग्या निर्माण झाल्या , तर दिग्दर्शक अंकुश भट्ट यांची ‘स्पर्श’ ही पंधरा मिनिटांची शॉर्टफिल्म नक्कीच पाहायला हवी.

ही गोष्ट आहे अभिजीत शेलार (के के मेनन) या पोलीस इन्स्पेक्‍टरची. रोजच्या त्याच त्या रुटीनला कंटाळलेला आणि नोकरीतून व्हीआरएस घेण्याच्या विचारतात असणारा एक अतिशय सरळसाधा माणूस. गोष्टीच्या सुरुवातीला या अभिजितला त्याच्या सिनिअर ऑफिसरचा कॉल येतो. ‘हिट अँड रन’ ची केस असते. ज्याने धडक दिली तो ‘बडे बाप का बेटा’ असतो त्यामुळे त्याला अटक वगैरे करू नको असा निर्णय अभिजीतला फोनवर ऐकवला जातो. अभिजीतच्या चेहऱ्यावरून हा निर्णय त्याला फारसा न पटल्याची आपल्याला जाणीव होते, पण सिस्टीमचाच एक भाग असणाऱ्या त्याची हतबलताही जाणवते. पंचनामा करायला पोहचल्यावर, ‘छेडछाडी’च्या एका घटनेची माहिती त्याला वायरलेसवर मिळते. घटनास्थळी अपघातात जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगून, अभिजित दुसरी घटना घडलेल्या जागेवर पोहचतो. ‘कॅबमध्ये बसल्यावर या ड्रायव्हरने मला हात लावला, माझ्याशी वाईट भाषेत बोलला’ अशी तक्रार करणारी एक तरुणी आणि ‘ही माझ्या धर्माबद्दल बोलली, हिने माझी कॉलर पकडली होती साहेब आधी’ असं सांगणारा ड्रायव्हर असे दोघे त्याला भेटतात.

‘सॉरी म्हणून विषय मिटवून टाकू’ असं अभिजितने सांगितल्यावरही ती तरुणी ‘ याला पोलीस स्टेशनला घेऊन जा’ असाच आग्रह धरते. तिच्या चेहऱ्यावर उठलेले बोटांचे वळ पाहून, अभिजित त्या तरुणीची तक्रार लिहून घेतो. पण तिच्या चिडण्याचं आणि वैतागाचं कारण वेगळं असू शकेल अशी शक्‍यता त्याला जाणवते. पुढे त्या कॅबमध्ये प्रवास करणारी दुसरी तरुणी पोलीस स्टेशनला येते आणि नेमकं काय घडलं ते आपल्याला समजत. पुढे पेट्रोलिंगला गेल्यावर तीच तक्रार करणारी तरुणी त्याच्या नजरेस पडते. आत्महत्या करण्यासाठी रेल्वेब्रिजवर उभ्या असणाऱ्या त्या मुलीला अभिजित वाचवतो का, ती आत्महत्या का करत असते, नेमकं काय बिघडलेलं असतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी ही शॉर्टफिल्म बघायला हवी.

अगदी क्वचित छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या के के मेनन यांचा अभिनय ही या शॉर्टफिल्मची जान आहे. रोज, नित्यनेमाने आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक प्रसंगातून ‘माणुसकी’ मांडणाऱ्या या गोष्टीतले प्रसंग, अनुभव, व्यक्तिरेखा अगदी आपल्यातलेच वाटावेत असेच आहेत. छोट्या-छोटया प्रसंगातून आपलं माणूसपण उलगडणारी ही शॉर्टफिल्म किमान एकदा अनुभवावी अशीच.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)