नवी दिल्ली – अमेरिकेने व्याजदर कपात न करण्याचे सूचित केल्यामुळे जागतिक चलन बाजारात डॉलरचा भाव वाढल्याने सोन्याच्या भावावर नकारात्मक परिणाम झाला. देशांतर्गत मागणी कमी असल्यामुळे भारतातही सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला.
अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफत मंगळवारी शुद्ध सोन्याच्या दरात 600 रुपयांची घट होऊन या सोन्याचा दर 34,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर स्टॅण्डर्ड सोन्याच्या दरात 600 रुपयांची घट होऊन या सोन्याचा दर 34,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 48 रुपयांनी कमी होऊन 38,900 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, डॉलर वधारल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक डॉलरकडे वळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले.