निमगाव म्हाळुंगी येथील घटना कारवाई टाळण्यासाठी खळबळजनक कृत्य
पोलिसांनी कारवाई करायची कशी ?
पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे होत असताना त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी गेल्यानंतर त्यांनाच दमदाटी होत आहे. त्यामुळे रक्षकांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. कारवाई करण्यासाठी पोलीस आल्यानंतर आरोपी हे स्वतःला पेटवून घेत आत्महत्याचा प्रयत्न करू लागल्यास पोलिसांनी कारवाई करायची तरी कशी, असा सवाल पोलीस कर्मचारी करीत आहेत.
शिक्रापूर – निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे गावठी दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर तेथे दारू विक्री करणारी व्यक्ती पोलिसांना धक्का देऊन पळून गेली. त्यांनतर पुन्हा येथून त्याने पोलिसांना दमदाटी करत स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी स्वतःच्या खिशातून दारूची पिशवी काढून अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बाळासाहेब बापूराव थिकोळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुनील रामदास काळे (वय 28, रा. लिंबओढा निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निमगाव म्हाळुंगी येथील एका ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बाळासाहेब थिकोळे त्या ठिकाणी गेले. त्यांना तेथे सुनील काळे हा विक्रेता दारूने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्या शेडमध्ये ठेवून आलेल्या लोकांना विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलीस थिकोळे यांनी साक्षीदारांना बोलावून दारूच्या पिशव्या नष्ट करताना दारू विक्री करणारा विक्रेता काळे हा थिकोळे यांना धक्का देऊन पळून गेला. त्यांनतर दारू नष्ट करून थिकोळे व साक्षीदार परिसरात दारूची पाहणी करून एक तासानंतर पुन्हा शिक्रापूरकडे येत होते. त्यांना सुनील काळे व काही व्यक्ती रस्त्याचे कडेला आपापसात भांडणे करीत असल्याचे दिसून आले.
त्यावेळी पोलीस हवालदार बाळासाहेब थिकोळे हे सुनील काळेला समजावून सांगत होते. काळे याने तुम्हा सगळ्यांना खोट्या केसमध्ये अडकवितो आणि गुन्ह्यात टाकतो, असे म्हणून खिशातून दारूची पिशवी काढून अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. यावेळी पोलीस हवालदार थिकोळे व व्यक्तींनी काळे याला विझविले. त्यानंतर सुनील काळेची पत्नी व नातेवाइकांच्या मदतीने थिकोळे यांनी काळेला स्वत:च्या गाडीतून शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, दारू विक्रेता सुनील काळे याने स्वतःला पेटवून घेतल्याने तो किरकोळ भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहे.