खोट्या जाहिरातीविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार

मुंबई: “शेतकऱ्यांना पाच दहा रुपयांचे चेक देताना सरकारला लाज कशी वाटत नाही…’ अशी खोटी व बदनामीकारक वक्तव्य असलेली निवडणूक जाहीरात प्रसिद्ध केल्याबद्दल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपाने मुंबईतील दहिसर पोलीस स्थानकात फौजदारी तक्रार दाखल करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

ही तक्रार भाजपा प्रदेश सचिव आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनिषा चौधरी आणि उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी दाखल केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून एक निवडणूक जाहीरात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित केली जात आहे. त्यामध्ये भाजपा महायुती राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाच-दहा रुपयांचे चेक दिले, असा खोटा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारे जाहीरात प्रसिद्ध करून लोकसभा निवडणुकीचे वातावरण दूषित करण्यात येत आहे. या जाहीरातीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1951 आणि भारतीय दंडविधानाच्या कलम 499, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 नुसार गुन्हा केला आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात शिक्षणमंत्री व भाजपाच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे सदस्य विनोद तावडे यांनी यापूर्वीच 16 एप्रिल रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अर्जात देण्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजनेमध्ये भाजपा सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने थेट खात्यामध्ये पैसे पाठविण्यात आले व कोणालाही चेक देण्यात आले नाहीत. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला दहा रुपये इतकी कमी रक्कम देण्यात आलेली नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)