पिंपरी – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी करत विवाहित महिलेला धमकी देण्यात आली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री सात ते मंगळवारी (दि. 4) पहाटे साडेबारा या कालावधीत आदित्य बिर्ला रुग्णालयासमोर आणि महिलेच्या घरी घडली.
स्वप्निल बांदल (रा. सेनापती बापट रोड, औंध, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल याने फिर्यादी महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयासमोरील बस स्टॉपवर तिच्या लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेला तिचे लग्न झाले असले तरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी जबरदस्ती करत होता. यासाठी फिर्यादी महिलेने नकार दिला असता त्यानंतर स्वप्निल याने महिलेशी गैरवर्तन केले. तसेच तिच्या घरी जाऊन सर्वांसमक्ष धमकी दिली.
याबाबत महिलेने पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.