पुणे ; नवीन विमानतळ रस्त्यावरून संजय पार्क आणि पुढे विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या डीपी रस्त्याचे काम अखेर सुरू झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून या रस्त्यासाठीची जागा नुकतीच ताब्यात आली असून या रस्त्याचे काम महापालिकेच्या पथ विभागाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती नगरसेवक राहूल भंडारे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली. हा रस्ता संजय पार्क पासून पुढे जोडला जाणार असून त्यामुळे वाहन चालकांना विमानतळाकडे न जाता या रस्त्याने थेट विश्रांतवाडी मधून आळंदीकडे जाणे शक्य होणार आहे. परिणामी विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीपासून सुटका मिळणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले.
भंडारे म्हणाले की, नवीन विमानतळ रस्त्यावरून दोराबजी मॉल पासून या डीपी रस्त्याची आखणी आहे. मात्र, हा झाला नसल्याने या ठिकाणी अवघा सहा मीटरचा कच्चा रस्ता होता. त्यातच पुढे जाऊन हा रस्ता बंद होता. या रस्त्यासाठीची जागा ताब्यात न आल्याने दोन्ही बाजूंना जोडणारा हा रस्ता होऊ शकला नाही. त्यामुळे नगर रस्त्यावरून आल्यानंतर आळंदीकडे जाणारी वाहने नवीन विमानतळ रस्त्याने विमानतळ, फाईव्ह नाईन चौक रस्त्याने पुढे जात होती. तसेच विश्रांतवाडीकडून येणारी वाहनेही याच मार्गे येत होती. मात्र, आता संजय पार्क सोसायटी पासून जाणारा हा रस्ता विकसित झाल्याने या वाहनांना विमानतळाकडे न जाता या पर्यायी रस्त्याचा वापर करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे विमानतळ रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले. तर गेली 25 वर्षे हे काम रखडले होते. त्यानंतर नगरसेवक म्हणून पाठपुरावा करून ते मार्गी लावल्याने आता नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय पार्क मधील नागरिकांनाही या रस्त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या नागरिकांना विमाननगर भागात येण्यासाठी फाईव्ह नाईन चौकातून लोहागाव विमानतळा समोरून विमान नगर आणि नगरस्त्याकडे यावे लागत होते. मात्र, या रस्त्याने या भागातील सुमारे 15 ते 20 हजार नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे.