पिंपरी – पिंपरी येथील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्स कंपनीत आणखी 116 अधिकारी व कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. 13 मार्चला याबाबत कंपनी व्यवस्थापनाने नोटीस काढली आहे. 20 तारखेपासून ही योजना लागू केली जाणार आहे. तथापि, त्यासाठी आवश्यक निधी (फंड) उपलब्ध झाल्यास ही योजना लागू होऊ शकते. अथवा, निधी उपलब्ध होईपर्यंत योजना पुढे ढकलली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
“एच.ए.’ कंपनीने यापूर्वी 250 कामगारांसाठी अचानक स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. 31 डिसेंबरपासून ही योजना लागू झाली. संबंधित योजनेतंर्गत ज्या कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली त्यातील काही कामगारांना अद्याप वैद्यकिय प्रतिपूर्तीची रक्कम मिळालेली नाही. 18 जून 2019 पासूनची ही रक्कम प्रलंबित आहे. तसेच, काही कर्मचाऱ्यांना वाहतूक बिलाची (ट्रान्सपोर्टेशन बिल) प्रत्येकी सरासरी 4 हजार रुपयांची रक्कम देखील मिळणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, कंपनी व्यवस्थापनाने नव्याने आणखी 116 जणांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये 35 अधिकारी आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
“एच.ए.’ कंपनीत नव्याने जाहीर केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अद्याप केंद्र सरकारकडून निधी मिळालेला नाही. हा निधी मिळाल्यानंतरच ही योजना लागू होऊ शकते. या स्वेच्छानिवृत्ती योजनेत सहभागी झालेल्या कामगारांव्यतिरिक्त कंपनीत शिल्लक राहणाऱ्या कामगारांना 29 महिन्यांच्या थकित पगाराची रक्कम मिळणे देखील अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.