पुणे – शहरातील येरवडा परिसरातील 64 वर्षीय महिला झिका व्हायरस पॉझिटिव्ह आढळली आहे. सदर महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने 10 नोव्हेम्बर रोजी तपासणीसाठी एनव्हीआय मध्ये पाठविण्यात आहे होते. 11 नोव्हेंबर रोजी अहवाल झिका पॉझिटीव्ह आला.
सदर महिला 15 ऑक्टोबरला केरळला गेली होती, तेव्हा त्यांना झिकाची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्या महिलेच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत. अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, सहसंचालक डॉक्टर प्रताप सिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर, येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका येथील कर्मचारी यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.
केरळमध्ये आढळले होते झिकाचे रुग्ण –
2020 ते 2021 या वर्षात भारतात सर्वप्रथम केरळमध्ये झिकाचे रुग्ण आढळून आले होते. तर, याआधी गुजरात राज्यात 2016- 17 मध्ये झिका व्हायरसचे नमुने समोर आले होते.
झिका विषाणू म्हणजे काय?
झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळं डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं.
झिका विषाणू कसा पसरतो?
झिका विषाणू प्रामुख्यानं एडीस डासांच्या प्रजातीमुळं पसरतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांना चावल्यानं विषाणू पसरतो. लैंगिक संबंधांमधूनही हा व्हायरस पसरू शकतो. तसंच, ब्लड ट्रान्सफ्युजनमधूनही झिका व्हायरस पसरण्याची शक्यता असते.
झिका व्हायरसची लक्षणे कोणती?
झिका व्हायरसमुळं 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तर, इतर, रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. डास चावल्यानंतर साधारणतः आठवड्यानंतर झिका व्हायरसची लक्षणे आढळून येतात.
झिका व्हायरसवर उपचार कोणते?
झिका व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही किंवा कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोके दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच, अधिक आराम करण्याचा सल्ला देतात.
काळ काळजी घ्याल?
साधारण पणे डास हे आंधाऱ्या जागी, ओलसर ठिकाणी किंवा साचलेल्या पाण्यात असतात. त्यामुळं अशा जागा वेळोवेळी स्वच्छ करा. तसंच, रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा. हा व्हायरस जीवघेणा नसला तरी ही काळजी घ्या. विशेषतः गर्भवती महिलांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.
झिका व्हायरस पहिल्यांदा कुठे आढळला होता?
युगांडाच्या जंगलात 1952 साली पहिल्यांदा झिका व्हायरस सापडल्याची नोंद आहे. त्यावेळी माकडांमार्फत माणसांना व्हायरसची लागण झाल्याचं सांगितलं जातं.