पुणे: संगमघाट येथील पार्किंगमध्ये एका तरुणाच्या डोक्यात वार करुन खुन करण्यात आला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश विष्णु कांबळे(29,रा.हडपसर रामटेकडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुध्द बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉक डाऊननंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा खुन आहे. यापुर्वी जामीनावर सुटलेल्या एका गुन्हेगाराचा एका फिरस्त्याने खुन केला होता. त्याच्या खुन्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली होती.
कांबळे हा सध्या कोणताही कामधंदा करत नाही. तो रामटेकडी येथे रहात असला तरी अनेकदा तो घराबाहेरच रहात असे. घटनेच्या दिवसीही तो घराबाहेर पडला होता. संगमघाट येथील पार्किंगमध्ये तो झोपला होता. यावेळी त्याच्या डोक्यात वार करुन खुन करण्यात आला. पहाटे स्थानिक व्यक्तीने ही माहिती कळवल्यावर पोलीस घटनास्थली दाखल झाले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे करत आहेत.