पाटणा – बिहारच्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर बिहारमधील माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी आज संयुक्त जनता दलामध्ये प्रवेश केला. पांडे यांनी अलिकडेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या छोट्या कार्यक्रमात त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला.
शनिवारीच पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र आपण निवडणूक लढवण्याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही, असे ते त्यावेळी म्हणाले होते. पोलीस महासंचालक म्हणून काम करत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आपण त्यांना भेटलो असल्याचे पांडे म्हणाले होते.
गेल्याच आठवड्यात पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. बिहार सरकारने त्यांची विनंती मंजूर केल्यानंतर मंगळवारी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. बिहार सरकारने पांडे यांना निवृत्ती घेण्यापूर्वीच्या तीन महिन्यांच्या कालावधीतूनही सूट दिली होती.
बिहार विधानसभेच्या निवडणूकांची दोनच दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणूकीदरम्यान 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.