सिंहगडरस्ता, दि. 11 (प्रतिनिधी) -धायरी येथील सर्वे नंबर 8/3 सयाजी इस्टेट बिल्डिंग लाइन परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर गेल्यावर्षी उभारलेल्या विद्युत खांबांवर अखेर महापालिकेने दिवे लावण्याच्या कामास सुरू केली आहे.
याबाबत “प्रभात’ने वृत्त (दि.4) प्रसिद्ध केले होते. या प्रकाराबाबत पालिका तसेच महावितरण विभाग प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी “दिवे’ लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत सदर काम सुरू करण्यात आले आहे.
सयाजी इस्टेट परिसरात गेल्यावर्षी सदर खांब उभे करण्यात आल्यानंतर वीजेकरीता लागणाऱ्या वायरींगचे कामही करण्यात आलेले नव्हते, संबंधीत कंत्राटदार फक्त खांब उभे करून गेला होता तसेच खोदकाम केलेला सिमेंटचा राडाराडाही उचलला नव्हता, याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या असताना याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते. अखेर “प्रभात’मध्ये वृत्त आल्यानंतर दिवे बसविण्याचे काम पालिका तसेच महावितरणने सुरू केले आहे. याबाबत माजी नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांनीही पाठपुरावा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.