पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर वसुलीचे एक हजार कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागापुढे अवघे सहा दिवस उरले आहेत. त्यासाठी झोन निहाय थकबाकीदार मिळकत धारकांची नावे वृत्तपत्रात छापून प्रसिध्द केली जात आहेत. आजअखेर एकूण ८६५ कोटी मालमत्ता कराची वसुली करण्यात यश आले आहे. उर्वरित १३५ कोटी कर वसुली पुढील सहा दिवसांत करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. गतवर्षी कर संकलन विभागाने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ८१४ कोटी रुपयांचा कर जमा करून घेण्यात यश मिळविले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत तब्बल ८६५ कोटीचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर, १३५ कोटी थकीत मालमत्ता कर वसूलपात्र आहे.
१ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
त्यासाठी थकबाकीदारांची नावे व थकीत कराची रक्कम मिळकतीच्या पत्त्यासह वर्तमानपत्रात प्रसिध्द केली जात आहेत. मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. जप्त मालमत्तांचा लिलाव काढण्यात येत आहे. नळजोड खंडित केले जात आहेत. याशिवाय, शासकीय सुट्टीच्या दिवशी कर भरण्यासाठी कार्यालये सुरु ठेवण्यात आली आहेत.
१४९१ मालमत्ता धारकांवर जप्ती
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने यंदा मालमत्ता जप्ती, सील आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा धडाका लावला आहे. असे असले तरी शहरात १ लाखाच्या वर मालमत्ता धारकांकडे तब्बल ६८२ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी विभागाने आता लिलावासारखी कठोर कारवाई सुरू केली आहे.
थकबाकी असलेल्या १ हजार ४९१ मालमत्ता धारकांना तुमची मालमत्ता जप्त केल्याबाबत कळविण्यात आले आहे. तर, प्रत्यक्षात १८४ मालमत्ता सील केल्या असून ५८४ मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
वसुलीच्या अंतिम टप्प्यात निवासी मालमत्तांची जप्ती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. पैसे भरण्याची क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली जात आहे. – नीलेश देशमुख सहायक आयुक्त