नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांची ग्वाही
पुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे आवश्यक आहे. येथे खंडपीठ सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांनी दिली. तसेच, वकील संरक्षण कायदा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूकीत विजयी झालेल्या ऍड. मुळीक यांनी ऍड. श्रीकांत आगस्ते यांच्याकडून अध्यक्ष पदाचा कार्यभार शुक्रवारी स्विकारला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नवनिर्वाचित उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे, ऍड. सचिन हिंगणेकर यांनी मागील उपाध्यक्ष अनुक्रमे ऍड. रुपेश कलाटे, ऍड. रवि लाढाणे, नवनिर्वाचित सचिव ऍड. घनश्याम दराडे, ऍड. विकास बाबर यांनी मागील सचिव अनुक्रमे ऍड. केदार शिंदे, ऍड. मनिष मगर, नवनिर्वाचित खजिनदार ऍड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी ऍड. सचिनकुमार गेलडा, नवनिर्वाचित हिशेब तपासणीस ऍड. ओंकार चव्हाण यांनी ऍड. नागेश जेधे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्विकारला. ऍड. महेश भांडे, ऍड. आनंद धोत्रे, ऍड. विराज करचे-पाटील, ऍड. आकाश मुसळे, ऍड. प्रिती पंडित, ऍड. सचिन पोटे, ऍड. अक्षय रतनगिरी, ऍड. अमोल तनपुरे, ऍड. अमित यादव आणि ऍड. सुषमा यादव यांनी कार्यकारिणी सदस्य पदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. राजेंद्र उमाप, निवडणूकीचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गिरीश शेडगे उपस्थित होते.
ऍड. मुळीक म्हणाले, बारच्या सभासदांची कायमस्वरूपी यादी तयार करणार आहे. निवडणूकीसाठी दरवर्षी पावती फाडून सभासदत्व देण्याची पध्दत बंद करणार आहे. न्यायालय आवार स्वच्छ ठेवणार आहे. न्यायालयातील कॅंटीनमधील स्वच्छता, खाद्य पदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी करणार आहे. ज्युनिअर वकिलांना कोट ठेवण्यासाठी लॉकर्स उभारणार, विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे वर्षभर आयोजन करणार आहे, ई-लॉयब्ररी तयार करणार आणि स्टडी सर्कल सुरू करणार, सध्या वकिलांना सर्वात जास्त सतावत असणारा पार्किंगचा प्रश्न योग्य नियोजन करून सोडविणार आणि ज्युडिशियल कॉन्फरन्सचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऍड. आगस्ते यांनी एक वर्षाच्या कालावधीत पुणे बार असोसिशनने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. ऍड. गिरीश शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ऍड. केदार शिंदे यांनी केले. तर, प्रशांत वाटविसावे यांनी आभार मानले.