पुणे – सुविधांअभावी अवहेलना सहन करावी लागणारे हडपसर रेल्वे स्थानक बाळसं धरण्याची चिन्हे दिसत आहेत. येथे टर्मिनस विकास आणि अन्य सुविधांसाठी 136 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास होणे गरजेचे आहे. पूर्वी यासाठी 17 कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र अर्धा हेक्टर जमिनींसाठीच तब्बल 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाला 136 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव दिला होता. त्याला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी मंजुरी दिली आहे.
रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बोर्डाने यापूर्वीच “गती-शक्ती’ युनिटची स्थापना केली आहे. आता हेच युनिट हडपसर टर्मिनसचा विकास करणार आहे. स्थानक विकासासह दोन नवीन स्टेबलिंग लाइन बांधणे, सिग्नलिंग यंत्रणा नव्याने उभारणे यांसह अन्य कामे होणार आहेत. येथील भूसंपादनासाठी पाच ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे काम झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सध्या सुविधांची वानवा
हडपसर स्थानक येथे सध्या दोन प्लॅटफार्म कार्यरत आहेत. तर, तीन प्लॅटफार्मचे बांधकाम पूर्ण; मात्र लाइन जोडण्याचे काम अपूर्ण, त्यामुळे वापर नाही. प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी खराडी मार्गावरील पुलाला किंवा मुंढवा येथून आडवाटेने यावे लागते. स्थानकावर प्रतीक्षालयासह स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नाही.
या कामांना प्राधान्य
हडपसर स्थानकावर नवीन तीन इमारती, प्रवाशांना बसण्यासाठी वेटिंग रूम, राहण्यासाठी रिटायरिंग रूम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, छोटेसे कॅन्टीन, प्रशस्त पार्किंग, फलाटावर पूर्ण कव्हर्ड शेड, स्थानकावर सरकता जिना अथवा लिफ्ट, प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंग, यांसह अन्य सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. शिवाय, स्थानकाला दोन्ही बाजूंनी प्रवेश करण्यासाठी रस्ता तयार करणार.
हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी 136 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला होता. तो मंजूर झाला आहे. यातून स्थानकाचा विकास केला जाईल. भू-संपादनदेखील करण्यात येणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.
– बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक