नवी दिल्ली- ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व लवकरात लवकर भारतीय कुस्तीपटूंना न्याय देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय यंत्रणेला केली आहे. भारतीय कुस्ती महासंघावर कठोर कारवाई केली जाऊ नये असे वाटत असेल तर येत्या 45 दिवसांत निवडणुका घ्या व त्याहीपूर्वी ब्रिजभूषण प्रकरणाचा तिढा सोडवा, असा सज्जड दमही संघटनेने दिला आहे.
भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन केले. मात्र, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना जंतरमंतरवरून जबरदस्तीने पोलीस बसमध्ये कोंबून नेले अन् आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादरम्यान हा प्रकार घडल्याने देशभरातून याबाबत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल ताशेरे ओढले आहेत. भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक अत्यंत वाईट आणि भीतीदायक आहे. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची स्थानिक कायद्याच्या चौकटीत बसणारी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
याचबरोबर आयओसीने भारतीय कुस्ती महासंघाला 45 दिवसांत निवडणूक घेतली नाही तर बंदी घालण्याची धमकीदेखील दिली आहे.
आयओसीने भारतीय कुस्ती महासंघावर कारवाई करण्याबाबत देखील सांगितले आहे. जेव्हापासून कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत तेव्हापासून आम्ही जागतिक कुस्ती संघटनेच्या संपर्कात आहोत. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जर कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर अत्यंत कठोर पावले उचलावी लागतील, असेही समितीने म्हटले आहे.