मुंबई – 3 जून 2013 रोजी जिया खानच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या आईने तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर हत्येचा आरोप केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी सुरज पांचोलीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज प्रियकर सूरज पांचोलीच्या संदर्भात निकाल दिला आहे. सुरज पांचोलीची सुसाईड नोटमध्ये लावण्यात आलेल्या सर्व आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
जियाने आत्महत्या केल्यानंतर तिच्याकडे सापडलेली सुसाईड नोट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावरूनच तिच्याशी प्रेम संबंध असलेल्या सुरज पांचोलीवर अनेक आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी अनेकदा त्याला तपासासाठी बोलवले देखील होते.
तब्बल दहा वर्षांनी या केसचा निकाल लागला असून आता सुरज पांचोलीची निर्दोष मुक्ताता करण्यात आली आहे. निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज म्हणाला की,”सत्याचा नेहमी विजय होतो”.
दरम्यान, या प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आलेला सूरज पांचोली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदित्य पांचोली यांचा मुलगा आहे. सूरजने अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे. सूरजने 2010 साली संजय लीला भन्साळींच्या ‘गुजारिश’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
त्यानंतर सूरजने 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ‘टाइम टू डान्स’, ‘हवा सिंह’ या सिनेमांतदेखील सूरज झळकला. सूरजला फिल्मफेअर, स्टार डस्ट, स्टार गिल्ड सारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार त्याला त्याच्या पहिल्या ‘हिरो’ या सिनेमासाठी मिळाले आहेत. तसेच, सूरज पांचोली हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक सुद्धा आहे.