मुंबई – बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतरचा आता विकी कौशलबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विकी आता लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
विशेष म्हणजे या भूमिकेसाठी विकीची लुक टेस्ट घेण्यात आली नाही. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, “मला खात्री आहे की, विकी या भूमिकेसाठी योग्य आहे. त्यामुळे त्याची टेस्ट घेण्यात आलेली नाही.” या चित्रपटासाठी विकीने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेण्यास देखील सुरुवात केली आहे. यासोबतच भाषाकौशल्य, घोडेस्वारी याचे देखील तो प्रशिक्षण घेणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरु होणार आहे. यात महाराणी येसूबाईंची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारणार असल्याची चर्चा आहे, परंतु याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या सिनेमातील प्री-प्रोडक्शनचे काम सुरु असून चित्रपटातील कलाकरांची भूमिका, वेशभूषा याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’ नंतर विकी ‘मेरे मेहबुब मेरे सनम’ आणि ‘सॅम बहाद्दुर’मध्ये दिसणार आहे. ‘सॅम बहाद्दुर’मध्ये तो सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.