नागपूर: नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. मोठ्या संख्येने येणार्या अनुयायांची पुरेशा सुविधांअभावी गैरसोय होत असते, याकडे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेचे लक्षवेधी सूचना मांडत लक्ष वेधले. दीक्षाभूमी वास्तुच्या विकासासाठी ३२५ कोटींचा आराखडा जाहीर करण्यात आला त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० कोटींचा धनादेश देण्यात आला. मात्र, या गोष्टीला दीड वर्ष उलटूनही त्याठिकाणी कुठल्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या कामकाजाला केव्हा मंजुरी देणार व उर्वरित निधी कधी मंजूर करणार, असा प्रश्न प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाचे काम हे दोन टप्प्यात करण्याचे ठरले असल्याने पुढील कामाला उशीर झाल्याचे मान्य केले. तरी पहिला टप्पा नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवाय या कामातून मुख्य स्तुपाला कोणतीही बाधा येणार नाही, नियोजित आराखडा पुढील पंधरा दिवसात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीकडून तयार करवून घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.