वॉशिंग्टन- ऑक्स्फर्ड विद्यापीठाकडून तयार केली जाणारी लस अगदी अंतिम टप्प्यात असताना आता अचानक त्यांनी उमेदवाराच्या चाचणीची प्रक्रिया थांबवली आहे. आतापर्यंतच्या संशोधनात ऑक्सफर्डच प्रगतीपथावर होते. त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांचे डोळे लागले असताना ही घटना घडली आहे. मात्र त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी काही आठवडे थांबा, असे सांगत आपला आशावाद व्यक्त केला आहे.
ऑक्स्फर्डच्या करोना लशीच्या चाचणीचे आयोजन करणाऱ्या एस्ट्राजेनकाने तूर्त चाचणी थांबवली आहे. हा रूटीनचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी हा एक हादरा मानला जातो आहे. ज्या उमेदवारावर चाचणी घेतली जात होती, तो रहस्यमयरित्या आजारी पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
एस्ट्राजेनका व्यतिरिक्त मॉडर्ना आणि पीफाययझर या दोन अमेरिकी कंपन्याही करोना लशीचे संशोधन करत आहेत. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होत असून त्याच्या अगोदर लस उपलब्ध करण्यासाठी तो देश व विशेषत: विद्यमान अध्यक्ष ट्रम्प प्रयत्नशील आहेत.
मंगळवारी नॉर्थ करोलीना येथील एका सभेत बोलतानाही ट्रम्प यांनी आणखी काही आठवडे थांबा असे विधान करून लवकरच लस येण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीपुर्वी जरी लस आली नाही, तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत ती नक्कीच दाखल होईल असा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला आहे.
आम्ही अत्यंत वेगाने यशस्वी लशीचे उत्पादन करत असून हा एक रेकॉर्ड असणार आहे. अगदी लवकरच आम्हाला लस मिळणार आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कोणालाही अशक्य वाटेल अशा पध्दतीने आम्ही काम केले आहे. आमची लस अत्यंत सुरक्षित आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.