उद्यान, वृक्षसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष : झाडांचा गुदमरतोय श्वास
जाधववाडी -करोनामुळे बरेच उद्योगधंदे मेताकुटीस आले आहेत. या महामारीत सर्वच क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लहान मोठे उद्योग, व्यावसायिक, क्लास, नोकरीविषयक जाहिरातदार पैसे खर्च करून जाहिरात करत नाहीत. ते रस्त्याच्या कडेला, महत्त्वाच्या चौकांमध्ये उभा असलेल्या झाडांच्या बुंद्यावर असे फुकटे जाहिरातदार जाहिराती लावत आहेत. त्या जाहिराती निघून जाऊ नयेत यासाठी झाडांच्या बुंद्यात खिळे ठोकले जात आहेत. परिणामी झाडांवर विपरीत परिणाम होऊन झाडे नष्ट होत आहेत. परंतु उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग याकडे डोळेझाक करत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करताना बाजूची झाडे काढून टाकली जात आहेत किंवा त्यांची छाटणी केली जात आहे. त्यामुळे शहरातील झाडांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. परंतु जी मोजकी झाडे शहर परिसरात राहिली आहेत. त्यावर फुकट्या जाहिरातदारांचा डोळा आहे. झाडांच्या खोडावर खिळ्याने अथवा स्टेपलर ठोकून पत्र्याच्या प्लेट्सद्वारे जाहिरातदार आपला मजकूर प्रकाशित करत आहेत.
केवळ उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे जाहिरातदार झाडांच्या मुळावर उठले आहेत. जागा मिळेल तिथे खिळ्यांद्वारे व स्टेपलर पद्धतीने झाडांच्या बुंद्यांवर लावलेले फलक शहरभर दिसत आहेत. झाडांना खिळेमुक्त करावे तसेच फुकट्या जाहिरातदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीय व वृक्षप्रेमींकडून होत आहे.
प्रशासनाची बघ्याची भूमिका
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. झाडांवर लावलेल्या जाहिरातींवर संपर्क क्रमांक दिलेला असतो. अशा जाहिरातदारांवर कारवाई करणे गरजेचे असताना केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने अशा फुकट्या जाहिरातदारांचे फावत आहे.
वेदनामुक्त वृक्ष
झाडांचे संवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे. झाडांच्या संवर्धनाऐवजी झाडांच्या मुळावर उठणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे. झाडे सध्या जाहिरातदारांच्या निशाण्यावर असून जवळपास अनेक झाडांवर फुकट्या जाहिरातदारांनी झाडांवर कब्जा केला आहे. वृक्षप्रेमी संघटनांनी शहरात अनेकदा खिळेमुक्त झाड, वेदनामुक्त वृक्ष अशी मोहीम राबविली आहे. परंतु त्यांच्या उपक्रमाचा फुकट्या जाहिरातदारांवर काहीही परिणाम झालेला नाही. याउलट त्यांनी स्टेपलरद्वारे जाहिरातीची संकल्पनेला सुरुवात केली आहे.