सांडपाण्याच्या दुर्गंधीने वाडेबोल्हाईकर त्रस्त

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नागरिकांची तक्रार

वाघोली (पुणे) – वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत गावठाणालगत सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनदेखील ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वाडेबोल्हाई येथील सांडपाण्याच्या लाइनमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तोंडी व लेखी तक्रार केली होती. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. वाडेबोल्हाई गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सांडपाण्याची व्यवस्थादेखील त्याच प्रमाणात असणे गरजेचे आहे. पाऊस थांबल्यानंतर याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होताच सांडपाण्याच्या लाईनचे काम तातडीने करून नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यात येणार आहे, असे सरपंच दीपक गावडे व माजी सरपंच कुशाबा गावडे यांनी सांगितले.

  • नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर
    पूर्वीच्या सांडपाण्याच्या लाइनमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी गावठाण लगत पसरली आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. मात्र सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.