पिंपळे निलख,(संदीप सोनार ) दि. 26 – जुनी सांगवी येथील बुद्धघोष सोसायटीमधील राजकुमार व माधुरी कांबळे यांच्या ज्येष्ठ चिरंजीव प्रेम कांबळे यांचा आज विवाह होता. योगायोगाने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा दिवस आणि लग्नाची तारीख एकच आली. परंतु लग्नाच्या धामधुमीत देखील भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला लोकशाहीतील सर्वांत मोठा हक्क म्हणजे मतदान करायला प्रेम विसरला नाही. बोहल्यावर चढण्याअगोदर त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क आधी बजावला.
भारत हा लोकशाही प्रदान देश आहे. लोकशाहीमध्ये मतदान हा भारतीय संविधानाने येथील मतदारांना दिलेला सर्वांत महत्त्वाचा हक्क आहे. या मतदानातून नागरिक आपल्या पसंदीच्या उमेदवाराला निवडून देत असतो. म्हणूनच मतदारांना मतदारराजा म्हणून संबोधले जाते. देशातील प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य कोणत्याही परिस्थितीमध्ये बजवावे ही भावना प्रेम यांच्या मनात असल्याने लग्नाच्या धामधुमीत देखील नवरदेव पारण्याला जाण्यासाठी असलेला पेहराव परिधान करून स्वतः इलेक्ट्रीक गाडी चालवत मतदान केंद्रावर येऊन त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान करून आपला हक्क बजावला आहे.
जुनी सांगवी येथील छायाचित्रकार राजकुमार कांबळे यांच्या मोठ्या मुलाचे रविवारी (दि. 26) दुपारी एक वाजता पुण्यातील नऱ्हे येथील मंगलकार्यालयात चि. सौ. का. मधुरा या वधुशी लग्न होणार आहे. परंतु मतदानाचा दिवस आणि लग्नसोहळ्याची तारीख एकाच दिवशी आल्याने त्यांनी लग्नसोहळ्यास उशीर होत असताना देखील अगोदर मतदानाचा हक्क नंतर लग्न अशी भूमिका घेत त्यांनी प्रथम मतदान केले आणि नंतर बोहल्यावर चढले. जुनी सांगवी येथील नॅशनल स्कूल येथील मतदान केंद्रावर प्रेम कांबळे यांनी मतदान केले. त्यांच्या या कृतीचे सांगवी परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. या वेळी प्रेम कांबळे, वडील राजकुमार कांबळे, आजी नलिनी शिंदे, भाऊ रणजित कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे उपस्थित होते.
आज माझे लग्न आहे. परंतु चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली. आणि मतदानाचा दिवस आणि माझ्या लग्नाची तारीख एकच असल्याने बोहल्यावर चढण्याअगोदर आपण जबाबदार नागरिक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलेल्या मतदानाचा हक्क व त्याचे महत्त्व व मोल ओळखून मी प्रथम मतदान करण्याचा निर्णय घेतला. लग्न दुपारी एक वाजता असल्याने लग्नाच्या पोशाखा परिधान करून मतदानासाठी आलो आहे. नंतर लग्नाच्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे मी आवाहन करत आहे.
– प्रेम कांबळे, नवरदेव, जुनी सांगवी.