सातारा -जिल्ह्यात करोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून 12 ते 14 या वयोगटातील मुलांना आतापर्यंत जिल्ह्यातील 14 हजार 75 मुलांना कार्बेव्हॅक्स लसीचा डोस देण्यात आला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात विविध वयोगटातील लसीकरण टप्याटप्याने केले जात आहे. केंद्र सरकारने 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील लसीकरण मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यातील एक हजार 725 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टप्याटप्याने लस दिली जात आहे. जिल्ह्यात पात्र वयोगटाचे एक लाख 20 हजारांहून अधिक विद्यार्थी असल्याने या लसीकरणासाठी कार्बेव्हॅक्स लसीचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहेत. या वयोगटाच्या लसीकरण मोहीमेचे आरोग्य विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कराड तालुक्यात सर्वाधिक दोन हजार 925 विद्यार्थ्याना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
सद्यस्थितीत 12 ते 14 वयोगटाचे लसीकरण सुरु आहे. शाळांमध्ये विशेष मोहीम राबवून लसीकरण केले जात आहेत. या मोहिमेची गती वाढवून जास्तीतजास्त लसीकरण करुन राज्यात अग्रेसर राहण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.
डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी