लोणंद – लोणंदच्या जनावरे बाजारात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यांसह परराज्यांतील खरेदीदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री केल्याने लोणंदच्या बाजारात आज दि. १३ रोजी कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरे बाजार बैल, गायी, म्हैस, शेळी, बकरी इत्यादींच्या खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला महत्वाचा ‘बकरी ईद’ सण येत्या सोमवारी येत आहे.
यादिवशी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची कुर्बानी देण्यात येते. त्यासाठी येथे चांगल्या प्रतिच्या बकऱ्यांसाठी लांबून खरेदीदार हजेरी लावत असतात. आजचा गुरूवारचा बाजार हा बकरी ईदच्या पूर्वीचा शेवटचा बाजार असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होणार याची कल्पना असल्याने बाजारात मोठी गर्दी झाली होती. कर्नाटक, गोवा, हुबळी, धारवाड , बंगळुरु यांसारख्या राज्याबाहेरील खरेदीदारांबरोबरच कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नगर या ठिकाणांहूनही मोठ्या संख्येने खरेदीदार आले होते. आजच्या बाजारात कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज सभापती सुनील शेळके- पाटील यांनी व्यक्त केला आहे. आजच्या बाजारात बोकड दहा हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत उपलब्ध होता. तर शेळ्या ९ हजार ते १८ हजार अशा दरात उपलब्ध होत्या. तर मेंढ्या दहा हजारापासून १९ हजारांपर्यंत विक्रीस उपलब्ध होत्या.
गर्वा कांदा नं. १- १८०१ ते ३०००
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गर्वा कांदा नं. १- १८०१ ते ३०००, गर्वा कांदा नं. २- ९०१ ते १८००, गर्वा कांदा गोल्टी ६०० ते ९०० असे दर निघाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुनील शेळके व उपसभापती भानुदास यादव यांनी दिली तसेच शेतकऱ्यांनी आपला शेती माल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव व्ही. एस. सपकाळ यांनी केले.