बीजिंग – अमेरिकेतील विदेशी मिशनशी संबंधित असलेल्या संस्थांच्या यादीत चिनच्या तेथील चार माध्यम संस्थांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरही बंदीची कारवाई केली जाणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संताप व्यक्त केला असून ट्रम्प प्रशासनाने प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणारी कृती केली असून त्यांच्या या कृतीला तितकेच ठोस प्रत्त्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे.
या प्रसारमाध्यम संस्थांचे चीन सरकार आणि तेथील कम्युनिस्ट पक्षांशी संबंध आहेत, असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे आणि त्यांच्यामुळे अमेरिकेचे हित धोक्यात येत असल्याचे कारण देत अमेरिकेने त्या माध्यम संस्थांवर बंदीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या विदेश व्यवहार मंत्र्यांचे प्रवक्ते झाओ लिज्जन यांनी सांगितले की, अमेरिका आता शीत युद्धाच्या मानसिकतेतून निर्णय घेऊ लागली आहे. तात्विक गैरसमजातूनही त्यांनी चीन विरोधात कृती सुरू केली असून त्यांनी तातडीने या मानसिकतेतून बाहेर यावे, अन्यथा चीनलाही त्यांना तसेच प्रत्युत्तर द्यावे लागेल.
चिनच्या या माध्यम संस्थांनी त्यांच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची ओळख उघड केलेली नाही तसेच त्यांनी अमेरिकेत मोठ्या मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत, असाही ट्रम्प प्रशासनाचा त्यांच्यावर आरोप आहे.