सध्या लोक डिजिटल व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)चा भरपूर वापर करताना दिसतात. मात्र डिजिटल व्यवहार जितके फायदेशीर तितकेच धोकादायकही आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाइन फसवणूक झपाट्याने वाढली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ही देशातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमच्या कामकाजासाठी एक व्यापक संस्था आहे.
हा रिझर्व्ह बॅंक आणि इंडियन बॅंक्स असोसिएशन (आयबीए)चा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतात पेमेंट आणि सेटलमेंट फ्रेमवर्क तयार करणे आहे. एनपीसीआयचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) एकाच बॅंक ऍपला अनेक बॅंक खाती जोडून आर्थिक व्यवहार सुलभ करते.
यूपीआय ही एक आंतरबॅंक निधी हस्तांतरण सुविधा आहे, ज्याद्वारे फोन नंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या मदतीने स्मार्टफोनवर पेमेंट करता येते. एनपीसीआय ही प्रणाली नियंत्रित करते. व्यवहार करताना, लक्षात ठेवा की तुम्हाला पैसे पाठवण्याची गरज असेल तेव्हाच तुम्हाला यूपीआय पिन टाकण्यास सांगितले जाईल.
जर तुम्हाला व्यवहारात अडचण येत असेल आणि ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याची गरज असेल तर फक्त पेमेंट ऍप्लिकेशन वापरा. इंटरनेटवर दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू नका. यूपीआय पिन एटीएम पिन सारखाच आहे, म्हणून तो कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही वेबसाइट किंवा फॉर्ममध्ये यूपीआय पिन टाकणे टाळा. ओटीपी वगैरे पेमेंटशी संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नका. सीव्हीव्ही नंबर, पासवर्ड कोणालाही देऊ नका.