बुलडाणा – बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची कार पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली. या कारच्या मागे पुढे चार ते पाच गाड्या उभ्या होत्या. ती वाहने पेटली असती तर मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. हा हल्ला करताना हल्लेखोरांनी या परिसरातील विद्युतपुरवठा तोडला होता. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यभर चर्चेत आले होते.
माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. हल्लेखोरांनी माझ्याशी सामना करावा. खुलेआम कुठेही बोलवावे. कुटुंबाशी खेळू नये. कुटुंबावर भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करू नये,’ असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. तसेच, राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.