पुणे – साथीसदृश स्थितीचा सामना करताना विभागीय आणि जागतिक स्तरावरील सहकार्याच्या महत्त्वावर करोनाच्या साथीने प्रकाशझोत टाकला आणि त्याचा धडा दिला, असे मत लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.
बहुराष्ट्रीय सराव “पॅनेक्स -21′ चे उद्घाटन करताना जनरल नरवणे बोलत होते. बिमस्टेक राष्ट्रांच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अंगाने एकीची भावना वृद्धिंगत करणे आणि सहकार्य वाढवण्याच्या हेतूने या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनरल नरवणे म्हणाले, प्रतिबंधात्मक उपाय, साथ संपवण्यासाठी धोरण आणि आचारसंहिता या गोष्टी जगातील प्रत्येकाला करोनाच्या साथीने शिकविल्या. करोनाच्या साथीने 2019 च्या अखेरीस निर्माण झालेली व्यापक आपत्कालीन स्थिती संपूर्ण जगाने अनुभवली आहे. त्यामुळे अनेक देशात त्याने अद्याप हाहाकार माजवला आहे.
एप्रिल मे 2021 मध्ये दुसऱ्या लाटेत अत्यंत वाईट अनुभवांना भारत सामोरा गेला. अनेक मौल्यवान व्यक्तींचे प्राण आपण गमावले. त्यामुळेच ही साथ आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित येण्याचे आव्हान संपूर्ण जगासमोर निर्माण झाले आहे.
विविध लसींचा विकास आणि लसीकरण मोहिमांमध्ये नागरिकांचा जलद सहभाग, हे यासंदर्भातील महत्त्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले. जागतिक समुदाय परस्परांच्या सहकार्यासाठी आगतिक झालेले दृष्य साथीने निर्माण केले एवढेच नव्हे तर औषधे आणि अन्य प्रशासकीय मदतीसाठी ते एकमेकांच्या मदतीला धावले, असे अभूतपूर्व चित्र निर्माण केले, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
नैसर्गिक आपत्तीत साथीसारखी परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट आपण पाहू शकत नाही, याची जाणीव देशाला आहे. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित मुकाबला ही सद्यस्थिती आहे. त्याचा जनतेवर परिणाम न होऊन देण्यासाठी त्याच्या एकत्रित मुकाबल्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बहुराष्ट्रीय सहकार्यातून विभागीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. बिमस्टेक राष्ट्रे अशा पद्धतीने अनेक वर्षे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या जोडलेली आहेत, असे ते म्हणाले.
बिमस्टेक विभागीय परिषदेत बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि भारताचा समावेश आहे.