नवी दिल्ली – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी दोघांची “क्युरेटिव्ह’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. न्या. एन.व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांच्या पिठाने विनय शर्मा आणि मुकेश कुमार या दोघा दोषींही याचिका फेटाळली. न्यायाधीशांच्या चेंबरमध्येच या याचिकेवरील कामकाज झाले. फाशीची शिक्षा झालेल्या दोषींसाठी “क्युरेटिव्ह’ याचिका ही अखेरची कायदेशीर तरतूद समजली जाते.
या दोन्ही दोषींच्या “क्युरेटिव्ह’ याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मत सर्व न्यायाधीशांनी एकमताने नोंदवले. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आलेला आहे. रुपा अशोक हुरा वि. अशोक हुरा आणि अन्य या 2002 च्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाल देऊन ही “क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने सांगितले.
न्या. अरुण मिश्रा, न्या. आर.एफ.नरिमन, न्या. आर. भानुमथी आणि अशोक भूषण हे यापिठाचे अन्य न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाने 7 जानेवारीला चारही दोषींविरोधात “डेथ वॉरंट’ बजावले होते. त्यानंतर विनय आणि मुकेश यांनी 9 जानेवारीला ही “क्युरेटिव्ह’ याचिका दाखल केली होती. अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता या दोघांनी “क्युरेटिव्ह’ याचिका दाखल केलेली नव्हती.