कराड -युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने निशिकांत निवास शिंदे (वय 21, रा. रेठरेकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) व परशुराम रमेश करवले (वय 23, रा. आटपाडी, जि. सांगली) या दोघांना अटक केली. त्यामध्ये तडीपार गुंडासह आणखी एकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मुजावर कॉलनीत राहणाऱ्या शहारुख मुल्ला याचा निशिकांत शिंदे व परशुराम करवले याच्याशी घरासमोर बसण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून रविवारी दि. 23 रोजी रात्री संशयितांनी मुजावर कॉलनीत पिस्तुलातून गोळीबार करुन शहारुख मुल्ला याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारातून शाहरुख मुल्ला बचावला. मात्र, गोळीबार करुन दोघे पसार झाले.
याबाबत शाहरुख मुल्ला याने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना दोघांचा ठावठिकाणा लागला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक निरीक्षक तब्बसुम शादीवान, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, कुलदीप कोळी, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांच्यासह पथकाने निशिकांत शिंदे याला कराडमधून, तर तडीपार गुंड परशुराम करवले याला आटपाडी येथून अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किंमतीची 2 पिस्तुल, पुंगळी व चाकू असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर तपास करीत आहेत.