सॅन फ्रान्सिको – टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला आहे. आता या निर्णयाविरोधात ट्विटरने न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे हा करार रद्द करणे एलॉन मस्क यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
एलॉन मस्क यांच्याविरोधात ट्विटर कंपनी कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटर कंपनी एलॉन मस्क यांनी कोर्टात खेचण्याची पूर्ण तयारी करत आहे. यासाठी ट्विटर कंपनीने मोठी कायदेशीर कंपनी अर्थात टॉप लॉ फर्मसोबत संपर्कात असल्याची माहिती आहे.
ट्विटरने एलॉन मस्क यांच्याविरोधात कायदेशीर लढाईचा पवित्रा निवडल्याचे चित्र आहे. ट्विटर कंपनीने न्यूयॉर्कमधील टॉप लॉ फर्म Wachtell, Lipton, Rosen & Karz LLP ची या लढाईसाठी नियुक्ती केली आहे. ट्विटर कंपनी पुढील आठवड्यात डेलावेअर येथे मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. तर मस्क यांनीही स्वत:च्या बचावाची तयारी केली आहे.
मस्क यांनी ट्विटर विरोधातील या खटल्यासाठी Quinn Emanuel Urquhart & Sullivan या लॉ फर्मची नियुक्ती केली आहे. दरम्यान, एलॉन मस्क यांनी शुक्रवारी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेणार नसल्याचे जाहीर केले. कंपनीने अटी मोडल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला आहे.