जिनेव्हा – संपूर्ण स्वदेशी कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीकडून जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात डब्लूएचओने आणखी माहिती मागवली आहे. तर आम्ही 90 टक्के माहिती अगोदरच दिली असून उर्वरीत माहिती जूनपर्यंत दिली जाणार असल्याचे भारत बायोटेकने भारत सरकारला कळवले आहे.
आपल्या लसीला आपत्कालीन मंजुरी मिळवण्यासाठी भारत बायोटेक प्रयत्नशील आहे. भारतात जरी या लसीला मंजुरी मिळाली असली तरी डब्लूएचओने तशी मंजुरी अद्याप दिलेली नाही. त्यांना भारत बायोटेककडून अजुन माहिती हवी असून ती मिळण्याची त्यांना प्रतिक्षा आहे.
डब्लूएचओने 18 मे रोजी आपल्या वेबसाइटवरही तसे नमूद केले आहे. वापराच्या परवानगीसाठी ज्या लसींची यादी तयार करण्यात आली आहे, त्यात जर कोणत्या लसीचे नाव समाविष्ट करायचे असेल तर त्यांच्याकडून कागदांची पूर्तता होणे आवश्यक असते. ती झाली की हा निर्णय घेतला जातो तसेच संबंधित कंपनीने याबाबत कोणता अर्ज केला असेल तर ती माहिती गोपनीय असते, असेही डब्लूएचओने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारत बायोटेकने याबाबत भारत सरकारशी संपर्क साधला असून आपण 90 टक्के कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे सरकारला कळवले आहे व उर्वरीत कागदपत्रे अथवा माहिती जूनपर्यंत दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठकही झाली असून त्या भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगलाही सहभागी झाले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतात कोव्हॅक्सिनला मंजुरी असली तरी डब्लूएचओची आपत्कालीन वापरासाठीची मंजुरी अद्याप मिळालेली नाही.