पौड – मुळशी तालुक्यातील तैलबैल येथील सुळक्यावर आरोहण करताना दोर तुटल्याने 200 फूट खाली पडून एका ट्रेकर्स युवकाचा मृत्यू झाला असल्याची घटना नुकतीच घडली. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कूच्या शिलेदारांनी या युवकाचा मृतदेह रेस्क्यू करत बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ बळीराम शिंदे (वय 25, रा. कात्रज, पुणे; मूळ गाव शिंदफळ, ता. तुळजापूर) मृत झालेल्या ट्रेकर्सचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ व इतर काही जणांचा ग्रुप तैलबैल येथे ट्रेकिंगसाठी आला होता. रात्री गावात मुक्काम केल्यानंतर रविवारी पहाटे 5.30 वाजता त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. सकाळी नऊच्या दरम्यान सोमनाथ शिंदे हा ट्रेकर्स खाली पडला. यामध्ये गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची ही माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे राजेंद्र कडु, महेश मसने, सुनिल गायकवाड, सूरज वरे, योगेश उंबरे, प्रणय अंबुरे, रतन सिंग, आदित्य पिलाने, हर्षल चौधरी, सिद्धेश निसाळ, सिद्धार्थ आढाव व गावातील मदत करणारे कार्यकर्ते अक्षय रोकडे, सुनील वरे, विनोद राऊत, मनीष माडवे, ज्ञानेश्वर मेने यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू करत शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला.