लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळ्यात रविवारी पहाटे दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. एक झाड संचेती लॉन्स समोर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तर दुसरे झाड कुमार हॉटेल समोरील नगरपालिका पार्किंग समोर पडले आहे.
झाडे पडल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेचे पथक व आयआरबी कंपनीच्या पथक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले आंब्याचे झाड बाजूला करण्याचे शर्तीचे प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली. तसेच लोणावळा नगरपालिकेच्या दुसऱ्या पथकाने पार्किंग जवळ पडलेले झाड काढून घेतले आहे.
संचेती लोन समोर मुंबई पुणे हायवे वरच झाड पडल्याने या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या पावसाळापूर्व वातावरणामुळे काही प्रमाणात वारा वाहत असल्याने झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत.