लोणी काळभोर – पुणे-सोलापूर महामार्गावर गेल्या तीन दिवसांत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 189 वाहनांवर कारवाई करत 72 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.
15 ते 17 मार्च या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात होता. लोणी काळभोर वाहतूक शाखेने कवडीपाट टोलनाका ते उरूळी कांचनपर्यंत या महामार्गावरील उभ्या वाहनांवर धडक कारवाई केली. या सर्व गाड्यांना जॅमर लावण्यात आले व वाहन मालकांना दंड भरण्यास भाग पाडले.
ही कारवाई वाहतूक शाखेतील हवालदार मुकुंद रणमोडे, संदीप देवकर, संतोष शिंदे, ट्रॅफिक वार्डन सुशांत वरळीकर, सागर बरकडे, सागर राऊत यांच्या पथकाने केली. आगामी काळातही कारवाई सुरू राहाणार असल्याचे सूरज बंडगर यांनी सांगितले.