पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. या कामादरम्यान गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत या प्रस्तावित वाहतूक मार्गावर “ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे. 23 डिसेंबरपासून विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता या मार्गावर प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल असणार आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले. अभिमानश्री बाणेर चौक ते सायकर चौक या मार्गावर अवजड वाहनांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बंदी करण्यात येणार आहे.
या मार्गांवर वाहतुकीत बदल
पुणे विद्यापीठ चौक-पाषाण रस्ता-पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय- अभिमानश्री बाणेर चौक-बाणेर रस्ता-यशदा- पुणे विद्यापीठ चौक असा रस्ता एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. शिवाजीनगरकडून पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी या मार्गाचा वापर करावा. तर पाषाणकडून पुणे विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री पाषाण चौकात डावीकडे वळून बाणेर रस्त्यावरून विद्यापीठ चौकाच्या रस्त्याचा वापर करावा.
गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बॅंकेशेजारून भोसलेनगरकडे जाणारा रस्ता – गणेशखिंड रस्त्यावरील वाहने भोसलेनगरमध्ये जाण्यासाठी एकेरी मार्ग केला आहे. भोसलेनगरमधून मुख्य गणेशखिंड रस्त्यावर येण्यासाठी रेंजहिल्स रस्त्याचा वापर करावा.
“नो हॉल्टिंग- नो पार्किंग’
पुणे विद्यापीठ चौक-पाषाण रस्ता-पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय-अभिमानश्री पाषाण चौक-अभिमानश्री बाणेर चौक-बाणेर रस्ता-सकाळनगर-यशदा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला “नो हॉल्टींग-नो पार्किंग’ असणार आहे.
अभिमानश्री बाणेर चौक ते सायकर चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूला “नो हॉल्टींग-नो पार्किंग’ असणार आहे.
राजीव गांधी पूल, औंध ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या रस्त्याच्या दोन्ही बाजूला “नो हॉल्टींग-नो पार्किंग’ असणार आहे.